जिल्हा राष्ट्रवादीत कोणतेही गटबाजी नाहीच ! : आदिक ( व्हिडीओ)

जळगाव राहूल शिरसाळे | जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा अंतर्गत कलह नसून येथे पक्ष मजबूत अवस्थेत आहे. नाथाभाऊंच्या आगमनामुळे आम्ही आता येथे मजबूत अवस्थेत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा निरिक्षक तथा राज्य सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. ते येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांच्या उपस्थितीत शहर व ग्रामिण पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पदाधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ड. रविंद्र भैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश आदिक म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी जळगाव हा अतिशय महत्वाचा असा जिल्हा असून येथे पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. येथून पक्षाला मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळे अजितदादांनी स्वत: जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली असून पक्षाने जिल्हा निरिक्षक म्हणून माझी नियुक्ती केली आहे. दरम्यान, नाथाभाऊंच्या पक्षात आगमनामुळे राष्ट्रवादीला मोठी मजबूती मिळाली असून आगामी निवडणुकांमध्ये याचे परिणाम दिसून येतील असा दावा आदिक यांनी केला.

जिल्हा राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत विचारणा केली असता अविनाश आदिक म्हणालेत की, जिल्ह्यात असा कोणताही प्रकार नसून सर्व जण एकोप्याने वाटचाल करत आहेत. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य तिथे महाविकास आघाडी म्हणूनच लढविण्यात येणार असल्याचेही आदिक यांनी स्पष्ट केले.

खालील व्हिडीओत पहा अविनाश आदिक यांची संपूर्ण पत्रकार परिषद.

 

Protected Content