देशाच्या संरक्षणात तडजोड नाही – लष्कर प्रमुख नरवणे

manoj narvane 1

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे लष्कर प्रमुख मनोज मुंकुंद नरवणे यांनी नॅशनल वॉर मेमोरिअलला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसेच यादरम्यान त्यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकारांच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे म्हटले.

 

देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल. सैन्यदलाचे जवान हे देश सुरक्षित ठेवतील. आम्ही देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. लष्कर, नौदल आणि हवाईदल देशाच्या सुरक्षेसाठी तयार आहेत. आम्ही मानवाधिकारांच्या रक्षणासाठीही विशेष काम करणार आहोत, असेही नरवणे यावेळी म्हणाले. लष्करी कारवाईसाठी सदैव तत्पर राहणे हे आमचे प्राधान्य असेल. आम्ही आमची क्षमता अधिक वाढवणार आहोत आणि पूर्वोत्तर क्षेत्रात आम्ही व्यापक काम करू असेही त्यांनी सांगितले.

माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी सक्ती आणि साहस देण्याची मी देवाकडे प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मंगळवारी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून मंगळवारी ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्षे सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱ्या अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केले. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खडतर लष्करी सेवेत रमलेल्या नरवणे यांना बागकामाचीही आवड आहे. लष्करी हद्दीत उद्यान, वाहतूक बेटांच्या सौंदर्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. योगासने हा त्यांच्या दिनक्रमातील महत्त्वाचा भाग असून लष्करी सेवेत त्यांनी ही आवड जोपासली आहे.

Protected Content