फक्त खुर्च्या तोडण्यासाठी मुख्यमंत्रीपद नाही ! : मुनगंटीवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फक्त खुर्च्या तोडण्यासाठी मुख्यमंत्रीपद नसून जनतेची सेवा करण्यासाठी हे पद असल्याचे नमूद करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.

सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर यांनी आज राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, कुणी मुकुट घालून मिरवण्यासाठी मुख्यमंत्रीपद नाही. कुणी मुख्यमंत्री व्हावे यासाठी देखील हे पद नसून ते जनसेवेसाठी आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत नाही. ते असते तर त्यांनी एका तासात दाखविले असते. आताही जर बहुमत असेल ते ते त्यांनी दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना अगदी उघडपणे धमकावण्यात येत आहे. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मोठा महत्वाचा आहे. उद्या विशेष अधिवेशनात बहुमत प्रस्ताव येणार असून यात या आमदारांना योग्य ती सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासाठी आम्ही आता विधानभवनातील सुरक्षेचा आढावा घेतल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

 

 

Protected Content