मुंबई प्रतिनिधी | कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अटळ असल्याचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.
आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत कोविडच्या स्थितीबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या की, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल हे एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपण जी यंत्रणा उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे. आज कुणालाही लॉकडाउन नकोय, निश्चितच लॉकडाउन असताच कामा नये. कारण, आता कुठेतरी सगळेजण सावरत आहेत आणि पुन्हा जर लॉकडाउनचं सावट निर्माण झालं तर सगळ्यांचं कंबरडं मोडेल. त्यामुळे सर्वांनी जर सर्व नियमांचे पालन केले योग्य ती काळजी घेतली आणि सर्वजण जबाबदारीने वागले तर आपल्याकडे लॉकडाउन होणार नाही. पण जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल. मुख्यमंत्री एक-दोन दिवसांमध्ये करोना परिस्थितीवर बोलू शकतात. कारण, रूग्ण संख्या तीन-चार पटीने वाढत आहे.
पेडणेकर पुढे म्हणाल्या की, रूग्ण संख्या वाढत आहे घाबरण्याची गरज नसली तरी तीन-चार पटी रूग्ण संख्या वाढणे ही बाब चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जी काही निर्बंध घातली गेली आहेत आणि ज्या पद्धतीने लसीकरणावर आपण जोर देत आहोत, लशीचे दोन्ही डोस हे झालेलेच पाहिजे. १५ ते १८ वयोगटामधील मुलांचं कालच्या दिवसात दोन ते अडीच हजाराच्या आत बर्यापैकी ९ केंद्रांवर लसीकरण झालेलं आहे. गर्दी टाळा असं नेहमीच मुख्यमंत्री सांगत असतात, थोडसं दुर्लक्ष नक्कीच होतंय. गर्दी टाळली पाहिजे, या गर्दी टाळण्यासाठी शिवसेनेने आपले दोन कार्यक्रम रद्द देखील केले. त्यामुळे सर्वांनीच गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळलं पाहिजे. नियमांचे पालन करून समारंभ केले पाहिजेत असे आवाहन देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी याप्रसंगी केले.