चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाघडू येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तोडून एकूण साडे सतरा हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघडू येथे स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तारेच्या कुंपणाचे काम सन २००९-१० साली ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आले आहेत. दरम्यान रविवार रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास स्मशानभूमीतील लोखंडी अँगल तोडून भंगार विक्रेतेला विक्री केल्याची गंभीर स्वरूपाची बाब उघडकीला आली. त्यावर ग्रामसेवक सुनिल पवार व ग्रामपंचायत सदस्य राहूल पाटील यांना गावात भंगार विक्रेतेच्या गाडीत सदर लोखंडी अँगल दिसून आले.
याबाबत भंगार विक्रेत्यांकडे विचारपूस केली असता विक्रेत्यांनी मी भिल्ल वस्तीतून विक्री केली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांनी अधिक माहिती विचारली असता भंगार विक्रेत्यांनी बोटाच्या साहाय्याने छगन मानसिंग गायकवाड, सोमनाथ छगन गायकवाड, अर्जून छगन गायकवाड व जगन छगन गायकवाड यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. एकूण १७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुनिल जगन्नाथ पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात वरील चौघांसह भंगार विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.