रेशन दुकानातून गव्हाच्या गोण्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे शासकीय रेशनदुकानातून २ क्विंटल रेशनच्या गव्हाच्या गोण्यांची चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चौकशी अंती अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे सुनील मधुकर पाटील यांचे शासकीय रेशनदुकान आहे. याठिकाणी शासनाने वितरित करण्यासाठी दिलेला गहू आणि तांदूळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित प्रमोद उर्फ गंप्या आनंदा सोनवणे रा. खेडी खुर्द याने शासकीय दुकानातून २ क्विंटल रेशनच्या गव्हाच्या गोण्यांची चोरी केली. चोरी झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानदार सुनील पाटील यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान चौकशीअंती ही चोरी प्रमोद सोनवणे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दुकानात काम करणारा किशोर पाचपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रमोद उर्फ गंप्या आनंदा सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे हे करीत आहे.

Protected Content