जळगाव प्रतिनिधी । ममूराबाद रोडवरील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेतून ३० हजार रुपये किमतीची पेपरची कटिंगची मशीन चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, प्रसाद संजय कासार (वय-२३) रा. चौगुले प्लॉट मारुती मंदिराजवळ जळगाव यांचे ममुराबाद रोडवरील हॉटेल श्री याच्या बाजूला मोकळ्या जागेत सुरज बँड कंपनीचे पेपर कटिंग मशीन लावली होती. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची पेपर कटिंगची मशीन चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. परिसरात शोधाशोध केल्यानंतर कुठलाही थांगपत्ता न लागल्यामुळे प्रसाद कासार यांनी सोमवारी ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.