जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथे नातेवाईकांचे निधन झाल्याने तेथे गेलेल्या सोमनाथ रामदास जाधव यांच्या श्यामनगरमधील बंद घरात चोरी करून चोरट्यांनी ३५ ते ४० हजार रुपये रोख व दागिने चोरुन नेले. ही घटना शनिवार, ६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेंटरिंग काम करणारे सोमनाथ जाधव हे श्याम नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते मुंबई येथे गेले आहे. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शनिवारी ६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता शेजारील मंडळींच्या लक्षात आला. त्या वेळी त्यांनी जाधव यांना या विषयी कळविले. त्या वेळी त्यांनी सांगितले की, घरात ३५ ते ४० हजार रुपये व काही सोने-चांदीचे दागिने होते. पोलिसांनाही या विषयी माहिती दिली असता रामानंद नगर पोलिसांनी पाहणी केली. मात्र घरात रोख रक्कम व दागिने नव्हते. त्यामुळे ते चोरीला गेले असावे, शेजारील मंडळींनी सांगितले. दरम्यान घरातून किती रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला हे घरमालक आल्यावरच समजेल.