जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या चपला, बुट विक्रेत्याच्या रिक्षातून ४२ हजार रूपये किंमतीच्या चपला, बुट व कपड्यांचा सामान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात ज्ञानेश्वर आत्माराम साखरे वय २४ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. चपला, बुट व कापड विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी त्यांच्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू १६५५) मध्ये विक्रीसाठी लागणारे विविध प्रकारच्या चपला, बुट आणि कापड सामान रिक्षात ठेवले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी रिक्षात ठेवलेला ४२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी रविवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहे.