जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर लाकूड पेठ परिसरातून तिन जणांच्या चार बकऱ्यांची चोरी झाल्याचे आज सकाळी ११ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शिवाजी नगर परिसरातील लाकूड पेठ भागात राहणारे अक्षय बाळासाहेब गायकवाड (वय-२६) हे खासगी नोकरी करून शेळीपालन देखील करतात. आज सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या मालकीच्या बकऱ्या बाहेर चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्यानंतर ११.३० वाजता पाऊस सुरू झाल्याने पुन्हा बकऱ्यांना बांधले. परंतू यात एक बकरी दिसून आली नाही. त्यांनी परिसरातून शोधाशोध केली असता त्यांच्या गल्लीतीलच नंदा बापू शेळके (वय-५४) रा. लाकूडपेठ यांच्या दोन बकऱ्या आणि गणेश बाळकृष्ण चौधरी (वय-४०) रा. लाकुडपेठ यांची १ बकरी चोरीस गेल्याचे समजले. शिवाजी नगर परिसर सर्वत्र शोधाशोध केली परंतू बकऱ्या मिळाल्या नाही. यासंदर्भात बकरी मालक अक्षय गायकवाड यांच्या इतरांनी शहर पोलीस ठाण्यात बकऱ्या चोरीबाबत तक्रार देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत पोलीसात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.