जळगावात दुचाकीस्वाराकडून पळविले पावणे दहा लाख रूपये !

जळगाव प्रतिनिधी । कुरियर कार्यालयात काम करणार्‍या दुचाकी स्वाराला लाथ मारून त्याला खाली पाडत त्याच्याकडून पावणे दहा लाख रूपयांची रक्कम पळविल्याची घटना शहरातील शिवाजीनगर भागात घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रीतम हरीभाऊ बागडे (वय ३०, रा. गेंदालाल मील परिसर, जळगाव) हा तरूण शहरातील क्विक कुरियरमध्ये कामाला आहे. या फर्मच्या माध्यमातून तो ग्राहकांना रोकड रक्कम देत असतो. दुसर्‍या दिवशी देण्यासाठीचे पैसे तो रात्री आपल्या घरी घेऊन जात असतो.

या अनुषंगाने सोमवारी रात्री तो कुरियरचे संचालक जितेंद्र सोमाणी यांच्याकडून ९ लाख ७४ हजार रूपये घेऊन आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. दरम्यान, शिवाजीनगर स्मशानभूमिजवळ मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्याला लाथ मारून पाडले व त्याच्याकडचे पैसे घेऊन पळ काढला. यावेळी प्रितमने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात याला यश लाभले नाही.

या संदर्भात रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच तपासाची चक्रे फिरवली असल्याची माहिती समोर आली आहे.

Protected Content