पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील रोकड, दागिन्यांसह महागड्या साड्या असा एकुण २ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रावसाहेब साहेबराव बेडीस्कर (वय-५०) रा. साईबाबा चौक, तामसवाडी ता. पारोळा हे कुटुंबियासह राहतात. शेती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी व ५ ते ४ डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान रावसाहेब बेडीस्कर हे घराल कुलूप लावून गेले होते.
अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी व कोयंडा तोडून घरात ठेवलेले ३५ हजाराची रोकड, १ लाख ६० हजार रूपये किंमतीचे दागिने आणि ५ हजार रूपये किंमतीच्या महागड्या साड्या असा एकुण २ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रावसाहेब बेडीस्कर यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड करीत आहे.