दिपनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील औष्णिक विद्युत केंद्रातील 1X660 मे.वॅ. प्रकल्पामध्ये रात्री जबरी चोरी झाल्याची घटना घडली. सदर चोरी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अखत्यारित्या काम करणाऱ्या के.एस.एल. कंपनीच्या स्टोअरमधून करण्यात आली. यात लाखोंचा माल लंपास करण्यात आल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आले आहे.
भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील 1X660 मे.वॅ. प्रकल्पामध्ये रात्री जबर चोरी झाल्याची घटना घडली. सदर चोरी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अखत्यारित्या काम करणाऱ्या के.एस.एल. कंपनीच्या स्टोअरमधून करण्यात आली. चोरट्यांनी के.एस.एल. कंपनीच्या स्टोअरचे कुलूप तोडून स्टोर मधील तांब्याचे सामान चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. चोरीमध्ये लाखो रुपयाचे साहित्य चोरी झाल्याची चर्चा प्रकल्पात सुरू आहे.सदर ठिकाणी कोणताही सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता.
लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून यापूर्वी प्रदर्शित झालेल्या बातमी मधून प्रकल्पाच्या सुरक्षा विभागाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उचलले गेले आहेत. मात्र प्रशासन हे गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. प्रकल्पामध्ये कामासाठी कार्यरत सर्व कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे प्रकल्पामध्ये प्रवेश पत्र मिळवणे कामी गरजेचे असताना सुद्धा महाजेनको प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने कोणतेही गरजेच्या कागदपत्रांची शहानिशा न करता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अधिपत्याखाली कार्यरत सर्व कामगारांना प्रवेशासाठी प्रवेश पत्र दिलेले असून त्यांचेकडे कोणत्याही कामगारांचे दस्तावेज उपलब्ध नाही.
औष्णिक विद्युत केंद्राच्या सुरक्षा प्रशासनाकडे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या अधिपत्याखालील काम करणाऱ्या कामगारांचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसून फक्त आर्थिक तडजोडी अंती कामगारांना प्रवेश पत्र दिले जाते. तसेच दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांना प्रकल्पामध्ये प्रवेशाचा परवाना बिना कागदपत्रांच्या आधारे पाचशे ते हजार रुपयात सुरक्षा विभागाकडून उपलब्ध करून दिला जातो.
दरम्यान, सदर चोऱ्यांमध्ये चोरांची आणि सुरक्षा विभागाची मिलीभगत असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सुरक्षा विभागाकडून आज पर्यंत झालेल्या सर्व कार्यवाही संशयास्पद आहेत. आज पर्यंत बऱ्याच तक्रारी होऊन सुद्धा महाजेनकोचे सुरक्षा अधिकारी रामटेके आणि एम.एस.एफ चे मुख्य खैरे यांच्यावर महाजनको प्रशासनाकडून कोणतेही कार्यवाही झालेली नसून प्रशासनाने लवकरात लवकर त्यांची बदली करण्याची मागणीची चर्चा परिसरामध्ये होत आहे. सर्व प्रकरणांची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता शशांक चव्हाण आणि उपमुख्य अभियंता वकारे यांना असून सुद्धा त्यांच्याकडून आज पर्यंत काडीमात्र कार्यवाही झालेली नाही. यामुळे येथे भविष्यात मोठी चोरी अथवा दुर्घटना होण्याची भीती आहे.