जळगाव (प्रतिनिधी) शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून आज सलग दुसऱ्या दिवशी चार ठिकाणी घरफोडी झाल्यामुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आज असोदा रेल्वे गेटजवळील कला वसंत नगरात दोन घरं, एक दुकान तर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये एक घर फोडण्यात आले आहे.
असोदा रेल्वे गेटजवळ असलेल्या कला वसंत नगरात महादेव विठ्ठल भोळे (वय ६५) हे कुटुंबासह राहतात. रात्री घरात झोपलेले असताना पहाटे ३.३० च्या सुमारास चोरट्यांनी खिडकीतून त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी आतून उघडली. चोरट्यांनी घरात प्रवेश करत दीड हजार रुपये असलेली पर्स चोरून नेली. पहाटे ४ वाजता घरातील कुटुंबीय उठले असता दरवाजा उघडा दिसल्याने घडलेला प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी पर्स घराच्या मागील बाजूला फेकून पळ काढला. दरम्यान घराच्या बाहेर असलेला लाईट चोरट्यांनी काढून घेतला होता. तसेच त्यांचा मुलगा लोकेश भोळे याच्या (एम.एच.१९.डिजी.८६२२) या क्रमांकाच्या दुचाकीच्या नळ्या, वायर कापून फेकल्या व पेट्रोल चोरले होते.
घराला कडी लावत दुकान फोडले
कला वसंत नगरातच मूलचंद देविदास साळुंखे यांचे किराणा दुकान आहे. ते कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर घराच्या बाहेरच असलेल्या किराणा दुकानाचे कुलूप तोडत दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान अस्तावस्त करून गल्ल्यातील दीड हजार रुपयाची रोकड लंपास करीत चोरट्यांनी पळ काढला.
कुटुंबीय वरच्या मजल्यावर, खाली चोरट्यांचा डल्ला
मूलचंद देविदास साळुंखे यांच्या घरामागेच शरद त्रंबक अहिरे हे परिवारासह राहतात. अहिरे हे घराच्या वरील मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी खालील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर किचनमध्ये ठेवलेली दीडशे रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत.
अमनपार्कमध्ये बंद घर फोडले
शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये प्लॉट क्रमांक ३२ मध्ये मोहम्मद अली इस्माईल अली सैय्यद हे आपल्या परिवारासह राहतात. ते बॉश चेसीस कंपनीत कामाला आहेत. मोहम्मद अली हे परिवारासह नातेवाईकांना भेटण्यासाठी मंगळवारी धुळे येथे गेले होते. रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या गेटवरून उडी घेत कंपाउंडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मुख्य दरवाज्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडत १२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.