
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चाकूसह संसदेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अज्ञात तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे. मात्र, असे असले तरी संसदेत कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. परंतु सागर इसा नामक तरुणाने संसदेच्या गेट क्रमांक १ मधून आत जाण्याच्या प्रयत्न केला. तेवढ्यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या लक्षात आले. या तरुणाच्या हातात चाकू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने त्या तरुणाला अडवत ताब्यात घेण्यात आले. सागर इसा हा दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो कशासाठी आला होता, चाकू घेऊन संसदेत प्रवेश करण्याचा त्याचा उद्देश काय, याबाबतही काही समजू शकलेले नाही. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे.