बाजार खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील 14 हजार 923 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील खोटेनगर परिसरातील राधिका हॉटेल परिसरात प्रतिभा प्रवीण बाविस्कर (वय-६१) या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २६ रोजी दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी दिप्ती सैंदाणे रा. नाशिक, लहान मुलगी स्नेहल शिंपी रा. नाशिक हा त्यांच्याकडे आल्या होत्या. दरम्यान, ते खोटेनगर येथून रिक्षाने सुभाष चौक येथे आल्या. त्यांनी सराफ बाजारातील एका सराफाच्या दुकानात चांदीची मोड दिली. त्यानंतर त्या खरेदीसाठी फुले मार्केट परिसरात आले.

मार्केटमधील चंदूलाल रसवंती शेजारी असलेल्या बॅगेच्या दुकानात त्या बॅग घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना बॅग पसंती झाल्यानंतर त्या दुकानदाराला पैसे देण्यासाठी त्यांनी मोठ्या पर्स बघितली असता, त्यांना त्यात ठेवलेले पाकीट दिसून आले नाही. तसेच पर्सची चैन देखील उघडीच होती. चोरट्यांनी प्रतिभा बाविस्कर यांच्या पर्समध्ये ठेवलेली ७ हजारांची रोकड, ६ हजारांचे दोन ग्रॅम वजनाच्या कानातल्या बाळ्या व १ हजार ९२३ रुपये चांदीची मोड दिल्याचे पैसे असा एकूण १४ हजार ९२३ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. दरम्यान, फुले मार्केटमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हात सफाई केली.

याप्रकरणी प्रतिभा बाविस्कर यांच्यासह त्यांच्या मुलींनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content