एरंडोल प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्यातील पातुरडा येथील महिलेस कॅन्सरचा आजार झाला. याच क्षणात देव रुपी मदतीस आलेल्या जय बाबाजी फाऊंडेशनच्या मदतीने महिलेस तात्काळ उपचार मिळाल्याने जीवनदान मिळाले असून लोक क्रांती युवा सेनेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
लोकक्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश महाजन हे नेहमी सातत्याने गरजू रुग्णांना त्यांनी स्थापन केलेल्या जय बाबाजी फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत करत असतात. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पातुरडा जिल्हा बुलढाणा येथील निर्मला गिरे यांना कॅन्सरचा प्रॉब्लेम उद्भवला व त्यासाठी तेथील डॉक्टरांनी त्यांना साधारण दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता. परंतु त्यांची तेवढी परिस्थिती नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले होते. अश्या वेळेला निर्मला गिरे यांनी एरंडोल येथील त्यांच्या जावईच्या माध्यमातून जय बाबाजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश महाजन यांना संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून फाऊंडेशनच्या मदतीने निर्मला गिरे यांचे सर्व उपचार मोफत घडवून आणले. त्यावेळी दुःखात सापडलेल्या गिरे कुटुंबाच्या चेहर्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले व त्यांनी लोक क्रांती युवा सेनेचे विभागीय अध्यक्ष उमेश महाजन यांचे आभार मानले.