मुक्ताईनगर, प्रतिनिधी । शहरातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दुरुस्ती करतांनाच तीन वेळा फुटली, याप्रकरणी आ. चंद्रकांत पाटील यांनी पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी भेट देत नगरपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंत्यांना पाईप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या.
सविस्तर माहिती अशी आहे की, शहरातील पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून खंडित झाला आहे. सर्वात आधी पूर्णा नदी पात्राला गाळ युक्त पूर स्थिती आल्याने जॅकवेल मधील पंप बंद पडले होते .यामुळे शहरातील पाणी पुरवठा बंद होता .परंतु गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्नात बुऱ्हाणपूर रोडवरील श्री पुरुषोत्तम खेवळकर यांच्या शेताजवळ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी वहन करणारी मुख्य पाईप लाईन फुटली होती. याचे दुरुस्ती चे काम होताच पाणी सुरू करताच पुन्हा ती प्रेशर ने फुटली. असे आजतागायत तिसऱ्यांदा झाले आहे. दरम्यान या काळात शहरातील नागरिकांना पाण्याचा थेंब मिळेनासा झाला आहे. सदरील प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाईप लाईन फुटलेल्या ठिकाणी भेट देत नगरपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता हर्षल सोनवणे यांना पाईप दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना केल्या व साहित्य चांगल्या दर्जाचे वापर करा असेही सांगितले.
प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती मुकेशचंद्र वानखेडे, गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष महाजन, संतोष (बबलू) कोळी, आरिफ आझाद, नूरमोहम्मद खान, युनूस खान यांचेसह पाणीपुरवठा कर्मचारी सागर पुनासे, भगवान वंजारी, गोलू पाटील आदींची उपस्थिती होती.
आज सायंकाळपासूनच पाणीपुरवठा सुरळीत होणार
दरम्यान , नैसर्गिक व तांत्रिक अडचणींमुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो, तसेच हे काम युद्धपातळीवर सुरू असून सायं .4 वाजेपासून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे यांनी सांगितले.