गावठी पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्या तरूणाच्या मुसक्या आवळल्या !


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी १२ ऑक्टोबर पहाटे केलेल्या कोबींग ऑपरेशनमध्ये एका १९ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडण्यात यश मिळवले. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली.

कोबींग ऑपरेशनमध्ये मिळाली माहिती:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रवींद्र निंबा बच्छे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ११ ऑक्टोबरच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर यांच्यासह पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सूर्यवंशी, राकेश महाजन यांचे पथक ‘कोबींग ऑपरेशन’साठी रवाना झाले होते.

यादरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजता गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे, घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन येणार आहे, अशी माहिती मिळताच पथकाने त्वरित त्या ठिकाणी सापळा रचला.

सापळ्यात अडकला आरोपी:
थोड्याच वेळात, पोलिसांना त्या मार्गावर संशयास्पद हालचाल करणारा एक तरुण दिसला. पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले आणि पंचांसमक्ष त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने आपले नाव मयुर राजू मोरे (वय १९, रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे सांगितले. पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीत मयुर मोरेच्या कमरेच्या उजव्या बाजूस लपवलेले ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि त्याच्या खिशात दोन जिवंत काडतूस असे एकूण ३२ हजार रुपये किंमतीचे अग्निशस्त्र मिळून आले. या शस्त्रासाठी त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचेही उघड झाले.

पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केला आणि आरोपी मयुर मोरे याला पुढील चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गणेश सायकर आणि गुन्हे शोध पथकाने ही महत्त्वपूर्ण कारवाई करून शहरात अवैध शस्त्रांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला आहे.