यावल( प्रतिनिधी) आपल्या देशात मागील पाच वर्षातील काळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. शेतकरी संकटात असल्याने सहकार क्षेत्र संकटात आहे. त्याचप्रमाणे जीएसटीमुळे छोटे उद्योग संपण्याच्या मार्गावर असतांना सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेवर कसा येऊ शकतो? याचे उत्तर कुणालाही मिळत नाहीय. देशात सर्व घटक नाराज असतांना मिळालेला विजय संशयास्पद असल्याचे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले. ते यावल येथे आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या आवारात संपन्न झालेल्या रावेर विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार शिरीष मधुकराव चौधरी होते. कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारवर हल्ला चढविला. ते पुढे म्हणाले की, सर्व पातळीवर देश हा संकटात होता. सर्वत्र नाराजी होती. त्यामुळे पुलवामाची घडलेली घटना की, घडविलेली घटना ? याचा हा परिणाम आहे की, ईव्हीएम यंत्रणेचा घोळ हे समजायला मार्ग नाही. एकंदरीत सर्व प्रकार संयशास्पद असून लोकशाहीच्या मार्गाने आपण शासन विरोधी बोललो तर देशद्रोही. नाही बोलले तर राष्ट्रवादी ही कसली लोकशाही आहे? नुकत्याच दोन-तीन महीन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे ३५० उमेदवार निवडुन येतात. मात्र, काही पक्षाचे कार्यकर्ते सोडुन कुणीही आतिषबाजी किंवा जल्लोष करताना दिसुन आला नसल्याचे आपण बघीतले. आपल्या देशाची लोकशाही ही जगात प्रथम क्रमांकाची असून बदललेल्या परिस्थितीमुळे आपल्या देशाकडे आता शंकेच्या नजरेने पाहीले जात आहे, अशी खंत या वेळी अरूणभाई गुजराथी यांनी व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून शंका निर्माण करणारी ईव्हीएम मशीनचा काय घोटाळा आहे, हे आपल्या लक्षा येऊ शकते. सत्तेतुन पैसा आणि पैशांच्या बळावर इतर पक्षांचे लोक फोडण्याचे काम देशात आजच्या घडीला भाजपाकडून करण्यात येत असल्याचे मत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांनी व्यक्त केले.
लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची मरगळ झटकून पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आणि आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी केले. यावेळी त्यांनी सांगीतले की, संपूर्ण जगातील देशामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतपत्रीकेवर मतदान घेतली जातात. मग भारतातील होणाऱ्या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनींचा आग्रह का धरला जात आहे? आगामी निवडणुका मतपत्रीकेवर घेण्यात यावे, अशी मागणी देशातल्या सर्वोच्च न्यायालयात आणि देशाच्या निवडणुक आयोगाकडे सर्व विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली असतांनाही तात्काळ निर्णय घेण्यात येत नसल्याचे चौधरी यांनी सांगीतले.
या मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, मसाकाचे चेअरमन शरद महाजन, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, राष्ट्रवादीचे विजय प्रेमचंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपले मार्गदर्शन केले. या मेळाव्यास माजी आमदार रमेशदादा चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राष्ट्रवादी आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, रावेर कॉंग्रेस पक्षाचे तालुकाधक्ष ज्ञानेश्वर महाजन, चोपडा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेन्द्र पाटील, जावेद जनाब, व्ही.आर. पाटील, खलील शाह कादर शाह, सिताराम पाटील, नरेन्द्र नारखेडे, कलीम मनीयार, प्रतिभा मोरे, मसाकाचे संचालक नथ्थु रमजान तडवी, काँग्रेसचे हाजी शब्बीर खान मोहम्मद खान,पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, माजी उपसभापती लिलाधर चौधरी, अनिल साठे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपास्थित होते.
मेळाव्याची प्रस्तावना काँग्रेस यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली. तर सुत्रसंचलन अमोल भिरुड यांनी केले. आभार राष्ट्रवादीचे यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर , संदीप सोनवणे ,राजु पिंजारी यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.