जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात ऊन्हाचा पारा ४३ अंशापर्यंत गेला असून, शुक्रवारी १७ मे रोजी जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील वसंतराव भगवान माळी (वय ७४) यांचा दुपारी ४ वाजता उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसंतराव माळी हे शिरसोली येथील रहिवाशी आहेत. ते शुक्रवारी १७ मे रोजी धरणगाव तालुक्यातील वंजारी खपाट येथे आपल्या नातेवाईकाकडे आयोजित लग्नासाठी गेले होते. दुपारी ४ वाजता ते शिरसोली येथे परत आले. त्यांना काहीवेळ अस्वस्थ वाटत असल्याने, गावातील बाजारपट्टा भागात काही वेळ बसले. अचानक ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले, सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून, त्यांना मृत घोषीत केले. जिल्हा रुग्णालयातील डॉ.सुशांत निकुंभ यांनी वसंतराव माळी यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, वसंतराव माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.