जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुना खेडी रोड परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी असोदा गावातून रविवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. गणेश राजेंद्र माळी (वय २९, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शनिपेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, वेगवेगळ्या घटनांच्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला. अखेर शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी गणेश राजेंद्र माळी याला आसोदा गावातून अटक केली आहे.
आरोपी गणेश माळी याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तो जळगाव एमआयडीसीतील ए.के. स्विच कंपनीत रोजंदारीवर काम करतो. शनिवार आणि रविवार कंपनीला सुट्टी असताना तो हे गुन्हे करत असे. यासाठी तो स्वतःची हिरो होंडा पॅशन मोटरसायकल वापरत होता, असे त्याने सांगितले. त्याने शनिपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दोन आणि एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एक असे एकूण तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीतील २३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.