स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तपासणीला यावे – अधिष्ठाता डॉ. ठाकूर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरिता लवकर निदान, लवकर उपचार या सूत्रानुसार वेळीच कर्करोग निर्मूलन होऊ शकते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निदान व संशोधन दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत असतो. त्यानिमित्ताने हा अख्खा महिना “पिंक मंथ” म्हणून ओळखला जातो. हा पिंक मंथ ब्रेस्ट कॅन्सर झालेल्यांना समर्पित आहे. महाराष्ट्र शासनाने देखील याविषयी जनजागृती हाती घेतली आहे. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग तपासणी अभियानअंतर्गत बुधवारी जनजागृती करण्यात आली.

यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर,  शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. राजेश जांभुळकर,  डॉ. प्रशांत देवरे, उपक्रमाच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता गावित उपस्थित होते. प्रस्तावनेतून डॉ. गावित यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. जेणेकरून आपल्याला आजार उदभवले असतील तर त्याची वेळेवर माहिती मिळून वेळीच उपचार करता येईल, असे सांगितले.

यावेळी यंदा प्रवेशित झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पथनाट्य सादर करून त्यातून स्तनांच्या आजारांसंदर्भात उपस्थित महिला व पुरुष नागरिकांना जनजागृती केली. त्याचबरोबर कनिष्ठ निवासी डॉ. सुनील गुट्टे आणि आंतरवासिता प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी देखील पथनाट्यमधून, ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णाची तपासणी कशी केली जाते व स्तनांच्या आजारांची उपचार पद्धती कशी असते याबाबत माहिती दिली.

सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार डॉ. ईश्वरी भोंबे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रज्ञा सोनवणे, समाजसेवा अधीक्षक प्रदीप पाडवी, राकेश सोनार, अभिषेक पाटील, प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content