अडचणीतील महिलेचा अनोळखी व्यक्तीकडून विनयभंग अन मारहाण

shivsena help

जळगाव प्रतिनिधी | खाजगी कामानिमित्त जळगावला आलेल्या एका महिलेला काम करून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी व्यक्तीने शरीरसुखाची मागणी करून तिने विरोध करताच तिला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एक ५७ वर्षीय महिला बस तिकीटाच्या स्मार्ट कार्डसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी दुपारी ३.०० वाजता आली होती. तिचे दाखल्याचे काम झाले नसल्यामुळे ती सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत तिथेच थांबून होती. त्यावेळी एक सडपातळ अन हिंदी भाषेत बोलणारा अनोळखी व्यक्ती तिच्याजवळ आला. त्याने विचारपूस केली व बस कार्डचे काम करणारा माझ्या ओळखीचा आहे, असे सांगितले. त्यानंतर तो सदर महिलेला सिव्हील हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या पावभाजीच्या दुकानावर घेऊन गेला. तेथून महिलेला रिक्षात बसवून त्याने पिंप्राळा हुडको रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या पडीत जागेत नेले. दरम्यान त्याने एका ठिकाणी रिक्षा थांबवून दारूची बाटली विकत घेतली. रात्री १०.३० ते ११.०० वाजेच्या दरम्यान दारू पिऊन त्याने मोकळया पडीक जागेत तिला नेले आणि शरीरसुखाची मागणी केली, मात्र याला तिने प्रतिकार केला असता अनोळखी व्यक्तीने तिला बुक्क्यांनी तोंडावर, डोळ्यांवर मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. मारहाण होत असताना तिने आरडाओरड केल्याने भामट्याने तेथून पळ काढला.

दरम्यान, तिला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्याने ती त्रासाने विव्हळत होती. यावेळी दुसऱ्या एका व्यक्तीने तिची अवस्था पाहून तत्काळ रामानंदनगर पोलिसांना त्याबद्दल माहिती कळवली. रामानंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन महिलेला उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास ठोंबरे करीत आहेत.

शिवसेना पदाधिकाऱ्याची माणुसकी
ही बाब शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण यांना समजली असता त्यांनी आपल्या सचिन सोनवणे, इस्माईल शेख, मुस्ताक पिंजारी, नाजिम खान व अन्य कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनीही रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रदिप चौधरी यांना दूरध्वनीवरुन सदर घटनेची माहिती दिली. प्रदिप चौधरी यांनी तातडीने घटनास्थळ गाठत महिलेची चौकशी केली आणि तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सदर महिलेस वेळीच उपचार मिळाल्याने तिची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, पठाण यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content