जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळच्या डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्यांनी खान्देशचा प्रसिद्ध ठेचा व कळण्याची भाकरी हा पदार्थ कशा प्रकारे तयार केला जातो, यासाठी आज (दि.१४) विद्यार्थ्यांनी स्वानूभवातून खान्देशी मेनू कार्यक्रमातून जाणून घेतला आहे.
इ 2 री च्या अभ्यासक्रमात मुलांना अन्न घटक या अंतर्गत भाजणे, मळणे, तळणे, पाखडणे, सोलने इत्यादी क्रिया दिलेल्या आहेत. यासाठी स्वतः मुलांनी चुलीवर मिरच्या भाजल्या, तसेच पाट्या-वंट्यावर त्या वाटून घातल्या, व भाकरी कशी तयार करतात ते पाहून स्वतः कृती ही केली. सर्वच प्रकारच्या क्रियांमध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला. या क्रियांची त्यांना ओळख व्हावी, पूर्वीच्या काळातील दगडी उपकरणांची ओळख व्हावी, संघभावना विकसीत करण्यासाठी व श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व कळावे, या उद्देशाने मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. इ 2 रीच्या वर्गशिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी कृतीद्वारे प्रकल्पात सहभाग घेतला.