श्रमदान करीत “व्हॅलेंटाईन डे” ला विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शिक्षक, संस्थेप्रती प्रेम

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अधिष्ठात्यांसह रविवारी १४ फेब्रुवारी रोजी श्रमदान करीत अनोख्या पध्दतीने “व्हॅलेंटाईन डे” साजरा केला.  वाहनतळाची जागा या स्वच्छता अभियानमुळे आता आणखी वाढली असून अधिकाधिक दुचाकी व चारचाकी पार्किंग करण्यासाठी वाहनतळ परिसर मोकळा झाला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित झाले होते. १७ डिसेंबर २०२० पासून कोरोनाव्यतिरिक्त व्याधींवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील सुविधा सुरू झाल्या. त्यासह एक फेब्रुवारीपासून वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू झाले. 

रुग्णालय व महाविद्यालयात गेट क्रमांक २ मधून वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनतळामध्ये रुग्णालय व महाविद्यालयातील गजबज आता वाढली असून दुचाकी पार्किंगसाठी जागा उरत नाही.  रविवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रेमदिनाच्या दिवशी  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वाहनतळाच्या जागेवर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत श्रमदान करून वाहनतळ सपाटीकरण मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विजय गायकवाड यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. श्रमदानामध्ये लहान मोठे दगड, गोटे, विविध कचरा यासह उंच व सखोल झालेली जमीन एकसारखी करणे अशा पद्धतीने काम करण्यात आले. त्याचबरोबर पूर्वीचे प्रसाधनगृहांचे राहिलेले अवशेष देखील यावेळी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. त्याचबरोबर वाहनतळ पार्किंगची जागा स्वच्छ झाल्यामुळे आता दुचाकी पार्किंगची जागा वाढली आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की, स्वच्छता केल्यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच संघटितपणे काम केल्यानंतर संघभावना वाढीस लागते. एकत्रित श्रम केल्याने वेळ कमी लागून अपेक्षित ध्येय लवकर साधता येते. स्वच्छता, संस्था आणि शिक्षकांप्रति आदर व्यक्त झाला.  आजचा श्रमदानाचा अनुभव अविस्मरणीय होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी अधिष्ठाता डॉ रामानंद यांनी सांगितले की,  विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान केले. यामुळे वाहनतळाचा परिसर बऱ्याच प्रमाणात मोठा झाला असून आता रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंग करायला मोठी जागा मोकळी झाली आहे. मी स्वतः देखील श्रमदानामध्ये सहभाग घेतला, असेही डॉ.रामानंद म्हणाले.

श्रमदानासाठी सुमारे १८० मुला-मुलींनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी  स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगेश बोरसे, ज्ञानेश्वर डहाके, मयुर पाटील,  जितेंद्र करोसिया, अजय जाधव,  प्रकाश पाटील, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, विद्यार्थी प्रतिनिधी सुजय पट्टणशेट्टी, सर्व्हेश काबरा यांच्यासह सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content