जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला सदर विद्यार्थिनीच्या भावाने व त्याच्या मित्रांनी चोप दिल्याची घटना रविवारी १३ रोजी रात्रीच्या सुमारास आदर्श नगरात घडली चोप दिल्यानंतर विद्यार्थ्याला रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाहेर गावाहून जळगाव येथे शिक्षणासाठी आलेला एक विद्यार्थी हा आदर्श नगरमध्ये राहतो. तो ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गेल्या चार ते पाच दिवसापासून ब्लॅकमेल करीत होता. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी या विद्यार्थिनीला तो सातत्याने देत होता. हा प्रकार असह्य झाल्याने सदर विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्यानंतर या मैत्रिणीने विद्यार्थिनीच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यावेळी विद्यार्थिनीच्या भावासह मित्रांनी ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधून काढले व त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. या विद्यार्थ्याकडे अनेक मोबाईल असून तो वेगवेगळ्या मुलींना हेरून त्यांना ब्लॅकमेल करीत होता, अशी माहिती मिळाली.