चोपड्यात चक्क १००० लिटर पाण्याची चोरी

743f4aec 83de 4867 9363 407e0fb6a77a

चोपडा (प्रतिनिधी) चोरी हा विषय आपणास नवा नाही. दररोज कुठे न कुठे चोऱ्या होताच असतात. मोटारसायकल, मंगळसूत्र, पाण्याचा पंप, सायकल, केबल, पर्स, रोकड अश्या अनेक वस्तू नेहमीच चोरीला जात असतात. पण चोपडा शहरात आज (दि.१०) अनोखी चोरी उघडकीस आली आहे, ती म्हणजे चक्क १००० लिटर पाणी चोरीस गेले आहे. ही चोरी वरवर पाहता कुणाला फारशी गंभीर वाटत नसेल तरी भविष्यात आपल्या वृत्तीत बदल झाला नाही तर हा विषय धोकादायक वळण घेवून संपूर्ण समाजासाठी अस्तित्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळेच या घटनेकडे प्रत्येकाने गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

 

याबाबत सविस्तर असे की, शहरात नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा १५ ते २० दिवसाआड करण्यात येत असतो. त्यामुळे चोपड्यातील नागरिक १५ दिवसांचे पाण्याचे नियोजन करीत असतात. प्रत्येकजण आपल्या परीने पाण्याची साठवण करून ठेवत असतो. याच पद्धतीने विवेकानंद शाळेतील शिक्षक राकेश विसपुते आणि त्यांची आई श्रीमती शशिकला विसपुते हे शहरातील बोरोलेनगर-2 मधील चारुशीला कॉलनीतील ‘ऋषिका पार्क’ येथे राहतात. यांनी आपल्या घराच्या छतावर २५०० लिटर आणि अंगणात १००० लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण केली आहे. नगरपालिकेने पाणी सोडले त्यादिवशी त्यांनी छतावरील टाकी पूर्ण भरली होती आणि अंगणातील टाकीही भरून ठेवली होती. रोज ती टाकी भरलेली आहे की नाही ? याची चाचपणी ते करीत होते.

काल रात्री ११.०० वाजेपर्यंत ते गप्पा मारत होते. त्यांनतर मात्र आज (दि.१०) सकाळी ११.००वाजता पाणी वर चढवण्यासाठी त्यांनी टाकीत पाहिले असता चक्क टाकीतले पाणी बेपत्ता झाले होते. त्याबद्दल आजूबाजूला त्यांनी विचारपूस केली असता कोणीही टाकीतून पाणी घेतले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र टाकीतून पाणी गायब होते, याचाच अर्थ असा की पाणी चोरी झाले होते. अशी माहिती विसपुते कुटुंबियांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले. शहरात पाणीटंचाई आहे, हे जरी सत्य असले तरी मात्र पाणी चोरीस जाईल, याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. जिल्ह्यात ही घटना कदाचित पहिलीच असावी. पाणी चोरी होणे हा शहर वासीयांसाठी गंभीर विषय आहे. या घटनेवर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर भविष्यात यापेक्षाही भयानक चित्र निर्माण होऊ शकते.

Add Comment

Protected Content