मुंबई (वृत्तसंस्था) आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह ३७ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १७६ अंकांच्या घसरणीसह ११ हजारांच्या खालीपर्यंत आला होता.
जगभरातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचं प्रमुख कारण सांगितले जात आहे. जर अमेरिकेने पुन्हा एकदा व्यापार युद्धाला तोंड फोडले आणि चीनला आयात करणाऱ्या सर्वच वस्तूंवर 25 टक्के जास्त कर द्यावा लागल्यास जगभरात मंदीचे ढग दाटू शकतात.
बाँड यील्डच्या ग्राफचे चक्र जेव्हा उलटे फिरू लागले होते, तेव्हाही 2008मध्ये आर्थिक संकट ओढावले होते. आज भारतात फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात खतरनाक मंदी आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या तीन महिन्यांमध्ये घसरण झाली असून, देशाचा विकासही मंदावला आहे. औद्योगिक उत्पादन आणि कोअर इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, पुढील महिन्यात रिलायन्सच्या जिओ फायबरची सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आल्याने या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळे आज बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले.