सर्व सामान्यांच्या समस्या सोडवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न – मुख्यमंत्री

jamner sabha

जामनेर, प्रतिनिधी | गेल्या १५ वर्षात आघाडी सरकारला त्यांच्या सत्ता काळात जी काम जमली नाहीत. ती भाजप सरकारने राज्यात आणि देशात पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. ते जामनेर येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मचांवर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, आ.एकनाथ खडसे, खा.रक्षा खडसे, उन्मेष पाटील, विकास भारूडे, आ. सुरेश भोळे, आ.चंदूलाल पटेल, माजी आ. गुरूमुख जगवाणी, आ.स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांवर दुष्काळचे संकट आले. त्या वेळी आमचे सरकार मदतीसाठी पाठीशी उभे राहिले आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज माफीची योजना महाराष्ट्राने राबवली आहे. ती योजना सुरुच असून बंद केलेली नाही. जोपर्यंत पात्र असलेला शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत योजना चालूच राहील. अशी ग्वाहीही त्यान दिली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी सरकारने त्यांच्या कार्य काळात शेतकऱ्यांना पंधरा वर्षात २० हजार कोटी रूपयांची मदत दिली. म्हणजे वर्षाला साधारण १२०० कोटी रुपये. तर भाजप सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात तीच मदत ५० हजार कोटी म्हणजे वर्षाला १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केली आहे. हे करीत असताना सिंचनाचे प्रकल्प पुर्ण केले तसेच विदर्भ असो की पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणचे जे प्रकल्प पंधरा वर्षात झाले नव्हते. ते गिरीश महाजनांनी त्यांच्या खात्याला न्याय देत पाच वर्षात मार्गी लावले आहेत. पाच वर्षात २० हजार किलोमीटरचे चांगले रस्ते करणारे महाराष्ट्र राज्य हे देशात एकमेव राज्य आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमधे महाराष्ट्र पिछाडीवर वर होता त्याला आपण पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केले आहे. देशातील मोठे मेडिकल हब जळगाव जिल्ह्यात होत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जगाच्या पाठीवर आता भारत बलशाली म्हणून ओळखला जातो. अगोदर कुणीही भारत कमकुवत म्हणून हल्ले करून जायचे, आता मोदींनी ही परिस्थिती बदलली आहे. आता महाराष्ट्र बदलतोय, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Protected Content