Home उद्योग खान्देश महोत्सवाच्या उद्घाटनात राज्यगीताचा पडला विसर; महापौरांनी व्यक्त केली दिलगिरी !

खान्देश महोत्सवाच्या उद्घाटनात राज्यगीताचा पडला विसर; महापौरांनी व्यक्त केली दिलगिरी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खान्देश महोत्सवा’चे उद्घाटन बुधवारी सागर पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या दिमाखदार सोहळ्यात शासनाच्या नियमानुसार ‘राज्यगीत’ वाजवण्याचा विसर पडल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे.

महोत्सवाचे स्वरूप आणि आकर्षण :
यंदा महोत्सवाचे सहावे वर्ष असून, यामध्ये एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती सजावटीच्या वस्तू, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने आणि किचन अप्लायन्सेसचा समावेश आहे. खरेदीसोबतच खवय्यांसाठी खान्देशी पद्धतीचे अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. २ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष स्पर्धा होणार असून, पैठणी व राणीहार सारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.

राज्यगीतावरून वाद आणि महापौरांची दिलगिरी :
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही शासकीय कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने करणे बंधनकारक आहे. मात्र, खान्देश महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजकांना या नियमाचा विसर पडल्याचे दिसून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आयोजकांच्या वतीने जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. “ही एक तांत्रिक चूक असून भविष्यात अशा चुका होणार नाहीत,” असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रशासनाची सावध भूमिका :
दुसरीकडे, या गोंधळाबाबत विचारले असता महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हा कार्यक्रम महिला व बालकल्याण विभागाचा असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकल्याचे पाहायला मिळाले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

या उद्घाटन सोहळ्याला महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह महायुतीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound