यावल तहसीलच्या आवारातून जप्त वाहन पळविले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले जप्त केलेले वाहन हे अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, किनगाव परिसरात दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी महसूल खात्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत अशोक लेलँड कंपनीचे वाहन हे अवैध गौणखनिजाजी वाहतूक करतांना आढळून आले होते. या प्रकरणी कार्यवाही करून सदर वाहन जप्त करण्यात आले होते. तर, हे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले होते.

दरम्यान, आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भूषण विठ्ठल कोळी, विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून सीसीटिव्हीचा कॅमेरा काढून टाकत नंतर आवारात लावलेला ट्रक पळवून नेला. या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी यावल पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, भूषण विठ्ठल कोळी, स्वप्नील तुषार कोळी आणि विठ्ठल भाऊलाल कोळी ( सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्या विरोधात भादंवि कलम ३७९, ३४१, ४२२ तसेच गौणखनिज कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासीम तडवी हे करत आहेत.

Protected Content