Home Cities जळगाव नेरी नाका परिसरातील रस्ता आजपासून तात्पुरता बंद; वाहतुकीत बदल

नेरी नाका परिसरातील रस्ता आजपासून तात्पुरता बंद; वाहतुकीत बदल

0
141

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील नेरी नाका परिसरात आजपासून वाहतूक बदल लागू करण्यात आला असून महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम स्मशानभूमी जवळील एसटी वर्कशॉप ते काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय दरम्यानचा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी, दिनांक 6 फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एसटी वर्कशॉप परिसरात पावसाळ्यात आणि दैनंदिन सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी रस्त्याच्या बांधकामापूर्वी सांडपाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी मोरी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम होणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहनांची दळणवळण तात्पुरती थांबविण्यात आली आहे.

या संदर्भात शहर अभियंता योगेश बोरोले यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना माहिती देताना सांगितले की, सांडपाणी निचऱ्याची ही मोरी भविष्यातील रस्त्याच्या टिकाऊपणासाठी अत्यंत आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ता उपलब्ध होईल.

दरम्यान, रस्ता बंद राहण्याच्या कालावधीत शाळकरी विद्यार्थी, स्थानिक रहिवासी तसेच एसटी वर्कशॉपकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेच्या वतीने पर्यायी मार्गांची सूचना लवकरच देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound