अमळनेर (प्रतिनिधी) दि ४ मे पासून सर्वच शाळांना जरी उन्हाळी सुटया लागल्या आहेत. दुसरीकडे मात्र, पारोळा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने शाळांमध्ये विद्यार्थांसाठी शालेय पोषण आहार वाटप सुरुच आहे. धाबे हे गांव गेल्या चार वर्षापासुन दुष्काळग्रस्त असल्याने दरवर्षी उन्हाळी सुटीत शालेय पोषण आहार वाटप सुरू असते. यावेळेचा सदउपयोग म्हणून वाचनातुन होऊ या समृद्ध सारे, मैत्री पुस्तकांशी हा उपक्रम दि ४ मे पासुन नियमित सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार शाळेच्या ग्रंथालयात असलेली ३०० पेक्षा पुस्तकं विद्यार्थ्यांना वाचनासाठी शिक्षक उपलब्ध करून देताय.
या संदर्भात अधिक असे की, सकाळी ७ ते १० अशी शाळेची वेळ असुन ९ वाजता आहराच्या वाटपाची वेळ आहे. धाबे ही आदिवासी वस्ती असल्याने लहान लहान पत्र्याची व झोपडी असलेली निवासस्थाने आहेत. गावात शाळा हीच एकमेव इमारत व शाळेचे एकमेक पटांगण असल्यामुळे सर्वच मुले शाळेच्या ओटयावर व मोकळ्या जागेतच जमतात व खेळतात. ५० विदयार्थ्यांपैकी रोज सरासरी ३६ विदयार्थी हजर असतात. तसेच अनेक मुलांच्या मामाचे गाव ही धाबे हेच असल्याने ते बाहेर गावी जात नाही. गरीब आदिवासी बांधवांची वस्ती असल्यामुळे नियमित पोषण आहार वाटप आवश्यक व गरजेचे आहे.
सकाळी तास अर्धा तास खेळल्यावर मात्र शालेय पोषण आहार शिजविला जाईपर्यंत त्यांच्या जवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी ठरविले. मुलांना शाळा व अभ्यासाच्या ताणतणावातुन मुक्त करुन त्यांचे मनोरंजनही होईल व त्यांच्या ज्ञानात भरही पडेल असा वाचनातुन होऊ या समृद्ध सारे, मैत्री पुस्तकांशी हा उपक्रम दि ४ मे पासुनच नियमित सुरु केला. शाळेच्या ग्रंथालयात असलेली व नुकतीच सर्व शिक्षा अभियानाच्या उपक्रमातील प्राप्त झालेली जवळ जवळ ३०० पेक्षा जास्त छान, सुंदर, रंगित, सचित्र गोष्टी, मुल्य शिक्षण, पर्यावरण विषयीची, पर्यटनाची माहिती देणारी, थोर पुरुषांची व संताची चरित्रे असणारी लहान मोठी पुस्तके शाळेच्या ओट्यावर छान पैकी आसन टाकुन विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देतात.
विद्यार्थी त्यांना आवडणारे पुस्तक घेतात. चित्रे बघतात, गोष्टी वाचतात तसेच एकमेकांशी पुस्तका विषयी चर्चा करतात. काही विद्यार्थी स्वतः वाचलेली गोष्टही सांगतात. तसेच मुख्याध्यापक साळुंखे यांच्या शेजारी राहणारे हिमांशु शाम शिंपी व रोहित अरुण महाजन हे इ ६ वी चे विदयार्थी त्यांच्या सोबत शाळेत येऊन लहान लहान गोष्टी विदयार्थ्यांना वाचुन दाखवितात. या अवांतर पुस्तकांच्या वाचनातुन विद्यार्थांमध्ये वाचनाची आवड निर्माण होतेय. तसेच वाचन क्षमतेचा विकास देखील होतोय. तर पुस्तकाचे मूलभूत अंग व इतर बाबींविषयी माहिती होते. वाचनातून शब्द संपत्ती वाढते. चिकित्सक वृत्ती व सर्जनशीलतेला वाव मिळतो. मुद्देसूद लेखन करण्याचे कौशल्य निर्माण होते. पर्यावरण, मुल्य शिक्षण, वैज्ञानिक व भौगोलिक माहिती होते. थोर पुरुष थोर महात्मे व संत यांचा जीवन परिचय होतो. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल आकर्षण निर्माण होऊन त्यांचे मनोरंजनही होत आहे.पोषण आहार घेण्यासाठी त्यांची उपस्थितीही टिकून आहे. म्हणुन १६ जूनपर्यंत हा उपक्रम नियमित सुरू ठेवण्याची ईच्छा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.