नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊन २८ तास उलटले असले तरी अद्याप मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ५४३ पैकी ५४२ जागांवर मतदान झाले होते. त्यातील ५४१ जागांचे अधिकृत निकाल आतापर्यंत जाहीर झाले असून अरुणाचल प्रदेशातील एका जागेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही.
अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या दोन जागा असून यापैकी अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. या मतदारसंघात अजूनही मतमोजणी सुरू आहे. केंद्रीय मंत्री व भाजप नेते किरेन रिजिजू आणि काँग्रेसचे नबाम तुकी यांच्यात येथे मुख्य लढत असून २ लाख २३ हजार ३६२ मते घेत रिजिजू यांनी येथे मोठी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुकी यांना ५० हजार ७२५ मते आतापर्यंत मिळाली आहेत. रिजिजू यांची आघाडी पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. रिजिजू यांनी २०१४ मध्ये याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तकाम संजय यांचा पराभव केला होता.
शिवसेना पाचव्या स्थानी :- आतापर्यंत ५४१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपला सर्वाधिक ३०२ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. द्रमुक २३ जागांसह तिसऱ्या स्थानी असून तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसला प्रत्येकी २२ जागा मिळाल्या आहेत. जागांनिहाय क्रमवारी लक्षात घेता शिवसेना १८ जागांसह देशातील सहाव्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यानंतर जदयुला १६, बिजू जनता दलाला १२ तर बसपाला १० जागा मिळाल्या आहेत. बाकी कोणत्याही पक्षाला १० चा आकडाही गाठता आलेला नाही. तेलंगण राष्ट्र समितीला ९, लोकजनशक्ती पार्टीला सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्षाला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या आहेत.