मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे असा हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस संपली, राहुल गांधी यांना भाजपा महत्व देत नाही असे म्हणणारे भाजपाचे डझनभर नेते, प्रवक्ते, मंत्री राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी व त्यांची बदनामी करण्यासाठी अहोरात्र झटत असताना दिसत आहेत. राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु करताच भाजपाच्या नेत्यांची कोल्हेकुई सुरु झाली कारण या यात्रेला जनतेचाच प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी संवाद साधत राहुलजी गांधी देश पिंजून काढत आहेत. १५० दिवस ३५०० किमीचा प्रवास व १२ राज्यातून ही यात्रा जाणार आहे. सुरुवातीलाच भाजपाला भारत जोड़ो यात्रेची इतकी भिती वाटू लागली आहे. यात्रा जसजशी पुढे जाईल तसा मिळणारा प्रतिसाद भाजपाचे डोळे दिपवणारा असेल. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर राहुलजी थेट केंद्र सरकारला जाब विचारत असून जनतेचे हे प्रश्नच महत्वाचे आहेत हे लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येते.
राहुलजी गांधी यांच्या टी शर्टची किंमत दाखवणाऱ्या पक्षाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी तर १० लाखांचा सुट, १.५ लाखांचा चष्मा, ८० हजाराची शाल, १२ लाखांची कार, ८ हजार कोटी रुपयांचे विमान वापरातात आणि वरून मी फकिर आहे असा कांगवा करतात. असा फकिर आपल्या देशाला लाभला आहे याचे भान भाजपाने तरी ठेवायला हवे. राहुलजी यांच्या टी शर्टची चिंता करण्यापेक्षा देशाच्या १३० कोटी जनतेला उघड्यावर आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची घटका भरत आली आहे त्याची चिंता भाजपाने करावी, अशी कोपरखिळीही पटोले यांनी लगावली.