वेतनासाठी शिक्षकांचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन (व्हीडीओ)

b4eccccd 4068 4ba3 b91a 32f6026c9c32

जळगाव (प्रतिनिधी) कार्यरत आणि सेवानिवृत्ती शिक्षकांचे अनुक्रमे ९ व ५ महिन्यांचे रखडलेले वेतन त्वरीत देण्यात यावे, यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दारासमोर धरणे आंदोलन झाले. हे आंदोलन जळगाव शहर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आले.

 

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १५ जुलै रोजी महापौर यांच्या दालनात वेतन व निवृत्ती वेतन देण्याबाबत आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमाताई भोळे तसेच उपमहापौर, न.पा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक यांच्यासह लेखापरीक्षक (लेखाधिकारी) यांच्या समवेत चर्चा झाली. त्यावेळी तीन दिवसात शासन अनुदान व महापालिका अनुदानातून शिक्षकांचे थकीत वेतन, थकीत सेवानिवृत्ती वेतन देण्याचा निर्णय झाला होता.परंतू त्याबाबत आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.

 

त्यानंतर १६ जुलै रोजी पत्र देवून लवकर तन देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. तसेच वेतन न दिल्यास दि. २२ जुलै पासून आंदोलन करण्यात येईल, असे सुचित केले होते. परंतू वेतन व निवृत्ती वेतन देण्याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. लेखापरीक्षका कडून हेतुपुरस्कर विलंब केला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून तात्काळ रखडलेले वेतन न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला आहे.

 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गंगाराम फेगडे, सरचिटणीस किशोर रोटे, राज्य उपाध्यक्ष शे. युनीस अ. सत्तार , कार्याध्यक्ष एकनाथ पाटील, उपाध्यक्ष कुरबान खा तडवी, किरण बाविस्कर, मो. साबीर शे. इमदाद, सचिन बोरसे, गुलाम दस्तगीर गुलाम रसूल, प्रभाकर चौधरी, पुनम सरोदे, नाजनीन बानो रिया उद्दीन, कुसुम पाटील, कविता चौधरी, संदीप रोकडे, आशिक तडवी, अभिजीत लावंड, मनोज गायकवाड आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते.

 

Protected Content