जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा परिषदच्या विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. दरम्यान, नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाले असून ही निवड ३ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड २ जानेवारीला होणार आहे.
जळगाव जि. प. मध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिला राखीव निघाले असून, सलग तिसऱ्यांदा महिलाराज येणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी तारीख जाहीर करण्यात आली असून, ही निवड प्रक्रिया ३ जानेवारीला होणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश पारीत करण्यात आला.
असा आहे कार्यक्रम :अध्यक्षपदाची निवड ३ जानेवारीला सकाळी अकराला जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी ११ ते १ दरम्यान अर्ज भरणे, यानंतर अर्जांची छानणी होवून २ वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. यानंतर अध्यक्ष निवड केली जाणार आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड संबंधित तालुक्यांच्या पंचायत समिती कार्यालयात २ जानेवारीला सकाळी अकराला होईल. तर विषय समित्यांच्या सभापतींची निवड नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारीला होणार आहे.