नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गुरुवारी (२५ जानेवारी) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून ते राजस्थानची राजधानी जयपूर येथून दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील आमेर किल्ला, हवा महल आणि खगोलशास्त्रीय वेधशाळा ‘जंतर मंतर’ला ते भेट देतील.
इमॅन्युएल मॅक्रॉन हे 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे असतील. या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे ते फ्रान्सचे सहावे नेते असतील. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सुमारे सहा तास जयपूरमध्ये राहणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत. हॉटेल ताज रामबाग पॅलेस येथे दोन्ही नेते भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध आणि विविध भू-राजकीय घडामोडींवर व्यापक चर्चा करतील.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी संध्याकाळी 5.30 वाजता इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे स्वागत करतील आणि दोन्ही नेते जंतर मंतर, हवा महल आणि अल्बर्ट हॉल संग्रहालयासह शहरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विविध ठिकाणांना भेट देतील.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे विमान आज (गुरुवारी) दुपारी 2.30 वाजता जयपूर विमानतळावर उतरेल आणि आज रात्री 8.50 वाजता दिल्लीला रवाना होईल. रोड शो जंतरमंतर परिसरातून संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल, तर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात संध्याकाळी ७.१५ वाजता चर्चा सुरू होईल.
इमॅन्युएल मॅक्रॉन उद्या (शुक्रवारी) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे ९५ सदस्यीय मार्चिंग पथक आणि ३३ सदस्यीय बँड पथकही परेडमध्ये सहभागी होणार आहे. दोन राफेल लढाऊ विमाने आणि फ्रेंच हवाई दलाचे एअरबस A330 मल्टी-रोल टँकर वाहतूक विमानही या समारंभात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या मेजवानीला इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी ७.१० वाजता मुर्मू यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्याच रात्री 10.05 वाजता ते दिल्लीहून फ्रान्सला रवाना होतील.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यंदा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहूणे
12 months ago
No Comments