जळगाव, प्रतिनिधी | दबलेल्या, पिचलेल्या माणसांचा आवाज आणि माणसांना सोबत घेणारा आपला शब्दातून व्यक्त होणारा मांडणारा कवी आपल्या कवितेला सर्वश्रेष्ठतेकडे नेत असतो. त्याची कविता समाजसमूहाची असते असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे भाषा सल्लागार सदस्य प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले. ते सत्यशोधक साहित्य परिषदेतर्फे राजेंद्र पारे लिखित ‘ठिगळ अन टाके’ या कवितासंग्रहाचे प्रकाशनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा कार्यक्रम अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, नागपूर येथील अनिरुद्ध कांबळे, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटन संघाचे कार्यकारणी सदस्य युवराज माळी , नगरसेवक तथा मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील , एकात्मिक समावेशीत शिक्षक व परिचर असोसिएशनचे राज्य कोषाध्यक्ष सुनील ढाकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतेदेशमुख यांनी पुढे सांगितले की, राजेंद्र पारे यांची कविता स्वाभिमानाच्या विपुल जागा असणारी आहे. चळवळीच्या पाया असल्या बरोबरच वारसा, वसा, मूल्य जोपासण्यासाठी असणारी ही कविता आहे. त्याचबरोबर, ज्या कवीकडे अस्वस्थता असते तो अश्या सूचक आणि सामाजिक भान असणारी कविता लिहु शकतो असेही त्यांनी मत मांडले. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, वेदना आणि संवेदना यांची असणारी कविता समाजाशी बोलत असते. त्या बोलण्यातून नवा इतिहास घडत असतो. याप्रसंगी अनिरुद्ध कांबळे, चंद्रकांत भंडारी, सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कवी राजेंद्र पारे यांनी आपल्या कवितेतून भावना व्यक्त केल्या. डॉ. मिलिंद बागूल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अ. फ. भालेराव यांनी तर आभार विजय लुल्हे यांनी मानले. यशस्वितेसाठी विजयकुमार अडकमोल, प्राध्यापक के. के. अहिरे. शिवराम शिरसाट. राहुल निकम, डॉ. प्रदीप सुरडकर, सुरेखा राजेंद्र पारे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी काम पाहिले.