जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद असल्याने विद्यार्थी घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करीत असतांना केसीई सोसायटी संचलित पी. जी. कॉलेजच्या विद्यार्थ्याने मोबाईल रेंज मिळत नसल्याने आपल्या घरापासून चार किलोमीटर पायी जाऊन सातपुडाच्या शिखरावरून प्रात्यक्षीक परीक्षा दिली आहे.
पी. जी. कॉलेजचा केमेस्ट्रीचा विद्यार्थी दिलवरसिंग वळवी हा नंदुरबार जिल्ह्यातील मोलागी गांवी वस्तीत राहतो. मात्र, तेथे मोबाईलला व्यवस्थित रेंज मिळविण्यासाठी थेट सातपुड्याच्या शिखरावर जावे लागते. दिलवरसिंग वळवी याने देखील आपली ऑरगॅनिक केमेस्ट्रीची ऑनलाईन प्रात्यक्षीक परीक्षा देण्यासाठी जवळपास ४ किलोमीटर पायी जाऊन सातपुड्याच्या शिखर गाठले. तेथे त्याच्या मोबाईलला रेंज मिळाल्याने त्याने आपली प्रात्यक्षिक परीक्षा दिली. त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतूक होत आहे. खरोखर हि घटना विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारी आहे. त्याला पी. जी. कॉलेजचे प्राध्यापक डॉ. आर. एम. पाटील व प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांचे सतत प्रोत्साहन मिळत असते.