‘जीएमसी’मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प पुढील आठवड्यात होणार कार्यान्वित

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पीएसए जनरेशन प्रकल्प पुढिल आठवड्यात कार्यान्वित होत असून त्याबाबत प्रकल्प प्रस्थापित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची अडचण सुटण्यासाठी आणखी मदत होणार आहे. यापूर्वी २० किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक रुग्णालयात कार्यान्वित आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावसाठी एक हजार लिटर पर मिनिट क्षमता असलेला पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्रकल्प संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्दारा मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. केंद्र शासनाच्या पीएम केअर्स निधीतून या प्रकल्पासाठी मिळालेल्या ३३ लाख २३ हजार ३७० रुपये इतक्या निधीला जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

प्रकल्पासाठी लागणारी केबल लाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. यासोबत एक २५० केव्ही चे जनरेटर मंजूर झालेले असून त्याची उपलब्धता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी मशिनरी रुग्णालयात दाखल झाली असून तिला जोडणीचे काम सुरु आहे. तसेच प्रकल्प प्रस्थापित केला जावून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. यानंतर पुढील आठवड़यात तो कार्यान्वित होईल. 

हा प्रकल्प निसर्गातील हवा ओढून त्यातून कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन वेगळा करुन शुध्द ऑक्सिजन साठवून ठेवील. हा ऑक्सिजन रुग्णांना देण्यासाठी उपयोगात येणार आहे. या प्रकल्पासाठी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून सदस्य सचिव म्हणून डॉ.प्रशांत देवरे तर सदस्य म्हणून डॉ.संदिप पटेल, डॉ.भाउराव नाखले, प्र.प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे, डॉ.बाळासाहेब सुरोशे हे काम पाहत आहे.

 

Protected Content