जळगाव प्रतिनिधी । माझ्यासमोर जळगाव मतदार संघातून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याची स्थिती असून त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महाआघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना व्यक्त केला. प्रस्तूत प्रतिनिधीने त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेवून निवडणुकीतील त्यांच्या प्रचार आघाडीबद्दल चर्चा केली असता ते बोलता होते.
जळगाव मतदार संघासाठी जवळपास गेल्या महिन्याभरापासून जेव्हा माझी उमेदवारी जाहिर झाली तेव्हापासून जळगाव मतदार संघातील जनतेशी संपर्क साधण्याच्या कामास सुरूवात केली. आता गेल्या आठवड्यापासून नागरीकांशी संपर्क साधून अनेकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या समस्या सोडवाव्यात अश्या नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. कारण मी गेल्या 20 ते 25 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात काम करत आहे. विविध पदांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिलो आहे. कोणताही व्यक्ती असो, त्याची जात-पात किंवा समाज न बघता त्यांच्या अडचणी आणि समस्या सोडविण्याचे काम केले आहे. कामे केल्यामुळे घराघरामध्ये मी परिचीत आहे. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी या मतदार संघातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.
विरोधकांचे परडे जड आहे का नाही याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला कोणतेच परडे जड जाणार नाही, कारण माझी उमेदवारी जाहिर होण्याच्या आगोदर भारतीय जनता पार्टी दावा करत होती की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारच मिळत नाही. परंतू ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून भाजपामध्ये खळबळ निर्माण झाली आणि त्यांच्यात प्रश्न उपस्थित झाला की, आता उमेदवारी कोणाला द्यायची ? सुरूवातीला खासदार ए.टी.नाना पाटील यांचा विचार सुरू असतांना करण पवार यांच्या नावाची चर्चा होती, त्यानंतर आमदार स्मिता वाघ यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्या प्रचारालाही लागल्या. परंतू ‘सर्व्हे’मध्ये स्मिता वाघ ह्या कमी पडणार असल्याची चिन्हे भाजपाला दिसू लागली. म्हणून त्यांनी आता आमदार उन्मेश पाटील यांचे नाव जाहिर केले आहे. कदाचित उन्मेश पाटील यांना देखील बदलण्याचा प्रयत्न केला असता कारण उमेदवारी दाखल करण्याची शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना कोणताही पर्याय नसल्यामुळे उन्मेश पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. माझ्यासमोर कोणताही उमेदवार निवडून येण्यासारखा नसल्याने विरोधक सारखे उमेदवार बदलत आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदार संघात सातत्याने भाजपाचे उमेदवार खासदार म्हणून निवडून येत आहे. परंतू दुर्देवाने या खासदारांनी मतदार संघात कुठल्याही प्रकारची ठोस अशी विकास कामे केलेली नाहीत. महत्वाच्या नार-पारचा प्रकल्पाची निवडणुकीपुरती जाहिरात करून मते मिळविण्याची कामे केली. मात्र तो प्रकल्प अद्यापही पुर्ण झालेला नाही. खासदार म्हणून निवड झाल्यानंतर मी सर्वप्रथम नार-पार प्रकल्पांचे काम पुर्ण करणार आहे. तसेच पाडळसरे धरणाचे काम मार्गी लावणार आहे. पद्मालय धरणाचा प्रस्ताव, गिरणा नदीवरील सात बलून बंधारे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यांची तांत्रिक अडचण होती त्या आमच्या कालावधीमध्ये सोडविण्याचा प्रयत्न केला. भाजपाची सत्ता आल्यानंतर ते काम मार्गी लागेल असे वाटले होते मात्र ते देखील अद्यापर्यंत मार्गी लागले नाही. त्याही कामाला पहिल्या दोन वर्षात पुर्ण करणार आहे. अशी अनेक कामे जळगाव मतदार संघात आहे, त्यात पुलांची कामे, कालवाची कामे, अंजनी धरणाचे पात्र वाढविण्याचे काम, गिरणा नदीवर काही नवीन बंधारे बांधण्याचे कामे अधिक प्राध्यान्य देण्यात येणार आहे, जेणे करून शेतीसाठी सिंचनाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
पहा । राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्याशी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी साधलेला संवाद