जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील शिव कॉलनीतील काद्री पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल भरणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलिसात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरात काद्री पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर अय्यब शहा बबन शहा वय-६७ रा. सलार नगर, जळगाव हे पेट्रोल भरण्याचे काम करतात. २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता अय्यब शहा हे पेट्रोल पंपावर असताना मिलिंद सोनावणे नामक व्यक्ती हा कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला. दरम्यान कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर अय्यब शहा यांनी पैसे मागितले. याचा राग आल्याने मिलिंद सोनवणे याने शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली. दरम्यान रात्री ९ वाजता याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार शिवीगाळ करणाऱ्या मिलिंद सोनवणे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास सहाय्यक फौजदार फौजदार संजय सपकाळे करीत आहे.