आयपीएलमध्ये संघाची संख्या वाढण्याची शक्यता

ipl nilav

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) सध्याला ८ संघ सहभागी आहेत. मात्र, आगामी आयपीएल-२०२० मध्ये आणखी संघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आगामी आयपीएल मोसमात आणखी एका नव्या संघाचा समावेश होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये एकूण दोन नव्या संघांच्या समावेशाची चर्चा असली तरी बीसीसीआय केवळ एकाच संघासाठी अनुकूल आहे. कारण, एकाच वेळी ९० पेक्षा जास्त सामन्याचे आयोजन करण्यासाठी पुरेशा विंडो उपलब्ध नाहीत. २०२२ पर्यंत ९ संघांसोबतच आयपीएल मालिका होऊ शकते. त्यानंतर आयसीसीच्या भविष्य दौरा कार्यक्रमावर आधारित निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आयसीसीच्या भविष्य दौरा कार्यक्रमामुळे बीसीसीआयला फक्त ९ संघांची परवानगी मिळू शकते, ज्यात एकूण ७६ सामने खेळले जातील. यासाठी सध्याची विंडो वाढवली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘जोपर्यंत २०२३ मध्ये नवीन भविष्य दौरा कार्यक्रम येत नाही, तोपर्यंत आयपीएलमध्ये फक्त ९ संघच चांगल्या पद्धतीने खेळू शकतात.’ दुसरं मोठं कारण म्हणजे बीसीसीआय नव्या फ्रँचायझीसाठी ३०० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास २००० कोटी रुपयांच्या बेस प्राइसबाबत विचार करत आहे. एकाच ठिकाणाहून या प्रकारची गुंतवणूक येईल का याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. आतापर्यंत आयपीएलच्या १२ एडिशन खेळल्या गेल्या आहेत. ज्यात चॅम्पियन मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे.

Protected Content