
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील साहित्यिक मिथुन ढिवरे लिखित ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. भंडारा येथील सुप्रसिद्ध साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’ यांच्या हस्ते गेल्या रविवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि संत परंपरेतील साहित्य सामान्य वाचकांपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.

मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमाणसांतील तुकोबा’ या पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन मागील वर्षी करण्यात आले होते. त्यानंतर या लेखनप्रवासाचा पुढील टप्पा म्हणून भाग दोन वाचकांच्या भेटीला आला आहे. संत साहित्याची व्यापक परंपरा आणि त्यातील विचार सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या साहित्यिका अस्मिता मेश्राम ‘पुष्पांजली’ यांनी साहित्य म्हणजे नेमके काय, साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कशी घडते आणि लेखकाने समाजाशी आपले नाते कशा पद्धतीने जोडावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. साहित्य हे केवळ लेखन नसून समाजमनाला दिशा देणारे आणि विचारांना समृद्ध करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थित होते. यावेळी साहित्यिक मिथुन ढिवरे यांनी आपल्या मनोगतात ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ या पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका आणि प्रेरणेविषयी माहिती दिली. संत परंपरा हीच या लेखनाची प्रमुख प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राला संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून संतांचे अभंग, विचार आणि साहित्य आजही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, या अभंगांमधील आशय सामान्य वाचकांपर्यंत सहजपणे पोहोचावा, या उद्देशाने ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’मध्ये अभंगांचे साध्या आणि सुबोध भाषेत निरूपणपर स्पष्टीकरण करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधील जीवनमूल्ये, सामाजिक संदेश आणि विचार सामान्य माणसाला समजावेत, यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेमीवंत धांडे सर होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी पुस्तकाचे महत्त्व तसेच मिथुन ढिवरे यांच्या साहित्यिक योगदानावर भाष्य केले. संत साहित्याचा अभ्यास करून ते सामान्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम महत्त्वपूर्ण असून अशा साहित्यनिर्मितीला समाजाने प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यास जळगाव शहरासह जिल्ह्यातील साहित्यिक, लेखक, वाचक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. साहित्यप्रेमींनी मिथुन ढिवरे यांच्या या साहित्यकृतीचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शांताराम तायडे यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना ‘जनमाणसांतील तुकोबा भाग दोन’ हे प्रकाशित पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले.



