एरंडोल प्रतिनिधी | हलाखीची परिस्थिती असलेल्या गरजू रुग्णाला हृदयाच्या ऑपरेशनसाठी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनकडून मदतीचा हात मिळाला असून त्यांचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील हिंगोणे बु. येथील ४५ वर्षीय भागवत पाटील यांना गेल्या वर्षभरापासून काम करतांना धाप लागत होती. ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले असता त्यांच्या हृदयाला होल असल्याचे निदान झाले. शास्रक्रियेसाठी त्यांना जवळपास चार ते पाच लाख रुपये खर्च लागेल असे सांगण्यात आले. हा खर्च पाटील यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कोणी मदत करेल या आशेने पाटील कुटुंब पाच ते सहा महिन्यांपासून वाट पाहत होते.
अशातचं त्यांच्या कुटुंबियांची भेट एरंडोल येथील पत्रकार रतिलाल पाटील यांच्याशी झाली असता त्यांनी ‘आरोग्य फौंडेशन’चे चेअरमन जितेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून मधुकर पाटील यांना काही मदत होईल का असे विचारले. त्यांनी लगेच त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठवा असे सांगितले. जितेंद्र पाटील यांनी त्यांना नवी मुंबई, नेरुळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करून पाटील यांच्या आरोग्य विषयी सर्व चाचण्या करून तज्ञ डॉक्टराकडून संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. आज मधुकर पाटील यांची प्रकृती व्यवस्थित असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी ‘आरोग्य धनसंपदा’चे अध्यक्ष जितेंद्र पाटील व पत्रकार रतिलाल पाटील यांचे आभार व्यक्त केले.