विद्यार्थ्यांना वर्गात मानसिक दृष्ट्या अध्यापन ग्रहण करण्याची गरज- कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्याचा विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी न रहाता परीक्षार्थी झाला असल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर ताण तणाव येत आहेत. ते टाळायचे असेल तर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये नियमित वर्ग करण्याची आणि वर्गात मानसिक दृष्ट्या अध्यापन ग्रहण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने परीक्षांचे कामकाज सांभाळणा-या महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी ताण-तणाव मुक्त / कॉपी मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरु प्रा.माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील, मानसशास्त्र विभागाच्या डॉ.वीणा महाजन, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, गणित शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.के.एफ.पवार उपस्थित होते.या कार्यशाळेत ९५ प्राध्यापक सहभागी झाले होते.

प्रा.माहेश्वरी यांनी तणावमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेविषयी सविस्तर भुमिका मांडली. ते म्हणाले की एकविसाव्या शतकात मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा,कामगीरी, चिंता आणि वाढत्या अपेक्षा यामुळे विद्यार्थी तणावात असतो. परीक्षा तशा पाहिल्यातर सोप्या असतात मात्र विद्यार्थी हा वर्गात हजर राहत नाही. केवळ परीक्षेपुरता जात असल्यामुळे तो परीक्षार्थी झाला आहे. शारीरिक व मानसिक दृष्ट्या नियमित वर्गात हजर राहुन शिकविलेले ग्रहण केले तर तणाव येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी कॅम्पसमध्ये आणि त्यानंतर वर्गात हजर कसा राहील याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवडेल अशा पध्दतीने शिकवावे. गरज असेल तेथे अध्यापनाची पध्दत बदलावी लागेल. केवळ चोवीस मिनीटे ऐकण्याची आणि ऑडिओ अथवा व्हिडीओ अडीच मिनीटे पहाण्याची क्षमता राहिली असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवरील ताण दुर करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासोबतच परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना समजावून सांगावे असे कुलगुरु प्रा. माहेश्वरी म्हणाले. वर्गात चांगले अक्षर आणि उत्तरपत्रिकेचे प्रेझेंन्टेशन चांगले असले तर उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होऊन गुणांमध्ये निश्चित फरक पडतो. क्रमाने सगळे प्रश्न सोडवायला विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. अशा काही टिप्स प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना द्याव्यात असे प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले.

या कार्यशाळेत संचालक प्रा.योगेश पाटील यांनी पहिल्या सत्रात परीक्षेसंर्दर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांना परीक्षा सवयीचा भाग करा ज्यामुळे त्यांना ताण येणार नाही.. उत्तरपत्रिकेवर कोणत्याही प्रकारच्या खुणा करु नयेत. केल्यास होणा-या शिक्षेची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. आसन क्रमांक निट टाकण्याची सूचना कनिष्ठ पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावी.गुणपत्रिकेतील विविध नोंदी विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्यात. असे प्रा.योगेश पाटील यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात प्रा. वीणा महाजन यांनी विद्यार्थ्यांचा मानसिक ताण तणाव कसा दुर करावा या बाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.प्रारंभी डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले. मच्छिंद्र पाटील यांनी आभार मानले.

Protected Content