धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या रिक्त झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सुरेखा महाजन यांचे नावही आघाडीवर अचानक समोर आले आहे. सौ.महाजन यांनी याआधी देखील प्रभारी नगराध्यक्षपद भूषविलेले आहे. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मोठा माळीवाडा परिसरात गुलाबराव पाटील यांना मिळालेल्या मातधिक्क्यात त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. तसेच सौ. महाजन यांचे पती विजय महाजन हे माळी समाजाचे युवानेते असल्यामुळे शिवसेनेकडून सुरेखा महाजन यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु आहे.
या संदर्भात अधिक असे की, शिवसेनेच्या माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सुरेखा महाजन या निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक विजय महाजन यांच्या धर्मपत्नी आहेत. सौ. महाजन या प्रभारी नगराध्यक्ष असतांना त्यांनी जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पाला गती दिली होती. तसेच नगरपालिका तसेच विधानसभा निवडणूकीतही मोठा माळी परिसरातून शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर राहिलेले आहेत. सौ. महाजन यांचे पती विजय महाजन हे महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या माळी समाज पंच मंडळाचे सदस्य आहेत. विकास कामांसह सर्वांशी जुळवून घेणाऱ्या स्वभावामुळे महाजन दाम्पत्य शहरात सर्वाना परिचित आहेत. विजय महाजन यांचे सर्वच राजकीय पक्षातील विविध नेत्यांशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या दृष्टीने सौ. महाजन यांच्यावर नावावर एकमत होऊ शकते. विजय महाजन यांचे शहरात मोठ्या प्रमाणात मित्रांचा गोतावळा आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या समाजानातूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो.