पॅरोलवर सुटलेल्या अन सहा वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीस अटक

63262a35 9ba2 4f49 9ac6 bd8c8a25a9c4

 

 

 

 

जळगाव (प्रतिनिधी) सुमारे २९ वर्षापूर्वी म्हणजेच १९९० मध्ये धुळे येथील एका खुनाच्या आरोपात जन्मठेप झालेला आरोपी चंद्रकांत दत्तात्रेय राजकुंवर (वय-६०) (रा.वसराल अहमदाबाद गुजरात) हा नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळे सात वर्षे जेलमध्ये असताना पॅरोलची सुट्टी मिळाल्याने बाहेर आलेला होता. मात्र सुट्टी संपल्यानंतरही जेलमध्ये परत न जाता त्याने पलायन केले होते व अहमदाबाद येथे तो आपल्या कुटुंबासह राहात होता. तिथे तो रिक्षा चालकाचे काम करीत होता. सदर फरार आरोपीस जळगावच्या एलसीबी पथकाने अटक करून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

 

सहा वर्षापासून फरार असलेल्या नाशिक जेलमधील या कैद्यास अटक करण्याची जबाबदारी जळगाव एलसीबी पथकावर होती. त्यानुसार जळगाव सुमारे दीड महिन्यापूर्वी आरोपी ताब्यात घेणे कामी गेले, असता पोलीस आल्याचे सुगावा लागल्याने त्याने अहमदाबाद येथून पळ काढून अज्ञात ठिकाणी वास्तव्य केले होते. सदर पथकाने पुन्हा आपल्या खबर्‍यामार्फत माहिती गोळा करणे सुरू केले. पथक सतत संपर्कात राहून फरार आरोपीवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार आरोपी चंद्रकांत राजकुवर याच्या मुलाचे लग्न दिनांक २४ मार्च रोजी अहमदाबाद येथील शुभम हॉल या ठिकाणी असून तो तेथे येत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबी पथकातील कर्मचारी हेड कॉन्स्टेबल शरीफ काजी, पोलीस नायक सुरज पाटील, युनूस शेख यांनी वेषांतर करून आरोपी ज्या मार्गाने येणार होता, त्या ठिकाणी पाळत ठेवली व तो एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये झोपलेला असताना त्याला ताब्यात घेतले. त्याला जळगाव येथे आणण्यात आले असून आरोपीविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादंवि २२४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्याला एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content